logo

नांदेड मधिल दिवाळी पहाट रद्द करण्याची पत्रकार कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नांदेड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. पूरपरिस्थितीमुळे शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला विरोध करत नांदेड जिल्हा पत्रकार कृती समितीने हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पत्रकार कृती समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सध्या अडचणीत आहे. पुरामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले असून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाची मदत अपुरी आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने दिवाळी पहाट सारखा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पत्रकार कृती समितीने यावेळी सुचवले आहे की दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी नियोजित केलेला निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा. विशेषतः ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अद्याप मदत मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना या निधीतून मदत करण्यात यावी, अशी विनंती समितीने केली आहे.

या निवेदनाद्वारे पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक भान ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. “संकटग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि त्याऐवजी अशा कार्यक्रमांवर खर्च करणे ही असंवेदनशीलता आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

16
7131 views