
एलसीबीची धडक कारवाई : म्हसवडमध्ये शेतात गांजाची लागवड; ४० किलो गांजा जप्त
सातारा :
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वरकुटे (ता. माण) गावातील तुपेवाडी येथे धाड टाकत गांजाच्या झाडांची अवैध लागवड उघडकीस आणली आहे. पोलिसांनी ४० किलो ४७८ ग्रॅम वजनाचा ओला गांजा, अंदाजे ₹१०,११,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शहाजी दाजी तुपे (वय ६५, रा. तुपेवाडी, वरकुटे, ता. माण) यास अटक करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून कारवाईचे नियोजन केले.
दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पो.उ.नि. विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तुपेवाडी येथे सापळा रचला. शेताची पाहणी केली असता तेथे गांजाच्या झाडांची विक्रीसाठी लागवड करण्यात आलेली असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान पोलिसांनी ओला गांजा, हिरवट पाने, फुले, काड्या व बीज यांचा मिळून एकूण ४० किलो गांजा जप्त केला.
या प्रकरणी म्हसवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ३२७/२०२५ अंतर्गत एन.डी.पी.एस. कायदा कलम ८, २०(ब)(२)(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अरुण देवकर, सपो.नि. रोहित फार्ने, पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, पो.उ.नि. परितोष दातीर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपो.नि. अक्षय सोनावणे, पो.उ.नि. अनिल वाघमोडे, तसेच अतिश घाडगे, शिवाजी गुरव, सचिन साळुंखे, सनी आवटे, अमित सपकाळ, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, धीरज महाडीक, अमर नारनवर, शशिकांत खाडे, रुपाली फडते, अभिजीत बहाद्दले, राहुल थोरात, वसीम मुलाणी आणि फॉरेन्सिक टीम यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.