
सर्प, विंचू दंशाने मृत्यू झालेल्यांना हवी पाच लाखांची मदत .
मुरलीधर भावसार – लोकमत न्यूज नेटवर्क
मंगळवार , दि . ०७ ऑक्टोबर २०२५
डोंबिवली :
सर्पदंश आणि विंचू चावल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी डोंबिवलीतील वैभव कुलकर्णी यांनी न्यायालयीन लढा दिला आहे. त्यांनी २०२२ साली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. सरकारने कुलकर्णी यांची मागणी विचारात घ्यावी, अशी न्यायालयाने सूचनाही दिली आहे.
सध्या सर्पदंशाच्या घटना वाढल्या असून त्यावरील उपचारासाठीच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. डोंबिवली व खांबाळपाडा परिसरात सर्पदंशाने एका मुलींसह तिच्या मावशीचा मृत्यू झाला.
याचिकाकर्ते कुलकर्णी हे निसर्ग विज्ञान संस्था सचिव म्हणून काम पाहतात. निसर्ग विज्ञान संस्थेने ठाणे जिल्ह्यात सर्प आणि विंचू दंशामुळे झालेल्या मृत्यूंचे सर्वेक्षण केले.
सर्वेक्षणानुसार, २००८ पासून आजपर्यंत सर्पदंशामुळे १४५ जणांचा आणि विंचू दंशामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ५२ महिला समाविष्ट आहेत.
कुलकर्णी यांनी निसर्ग विज्ञान संस्थेमार्फत सरकार दरबारी हा मुद्दा सातत्याने मांडला. मात्र राज्य सरकारने अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही.
अन्य राज्यांत दिली जाते मदत :
कुत्रा, माकड, वाघ, बिबट्या इत्यादींच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत मिळते.
मात्र सर्प व विंचू दंशाने मृत्यू झाल्यास अशी मदत मिळत नाही.
काही राज्यांत मात्र सर्पदंश मृत्यूसाठी पाच लाख रुपये मदतीची तरतूद आहे.
कुलकर्णींची मागणी:
महाराष्ट्रातही सर्पदंश व विंचू दंशाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात सर्पदंश उपचार केंद्रे व आरोग्य प्रशिक्षण वाढवावे.