
तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न
तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न
श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो” च्या जल्लोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार साजरा करण्यात आला.
पहाटे श्री तुळजाभवानी देवीची १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगार (अहिल्यानगर) येथून आलेल्या मानाच्या पालखीतून मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करत मिरवणूक काढण्यात आली. प्रदक्षिणेच्या दरम्यान देवीची पालखी पिंपळाच्या पारावर टेकवून आरती करण्यात आली.
विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवी आपले सिंहासन सोडून भाविकांसोबत सीमोल्लंघन करण्यासाठी मंदिराबाहेर येते, अशी परंपरा आहे. सीमोल्लंघन पूर्ण झाल्यानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी संपूर्ण परिसरात कुंकवाची मुक्त उधळण करण्यात आली. भाविकांच्या “आई राजा उदो-उदो” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
मंदिरातील या धार्मिक सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी शारदीय नवरात्रात होणाऱ्या या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. आजही पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिर परिसरात जमले होते. कुंकवाची उधळण, देवीच्या जयघोषांनी तुळजापूर नगरी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली.