
नुकसान टळले, हास्य उमलले – माणुसकीचा विजय घडवणारे दिनेश येवले!
नुकसान टळले, हास्य उमलले – माणुसकीचा विजय घडवणारे दिनेश येवले!
अमळनेर प्रतिनिधी
हिंगोणा येथील श्री. गणपत लटकन सैंदाणे हे काही कामानिमित्त तहसील कार्यालय परिसरात आले असता त्यांच्या पिशवीतील लाखाच्या वर रकमेची मुदत ठेव पावती हरवली. ती पावती दिनेश येवले यांना सापडली. एवढ्या मोठ्या रकमेची पावती पाहून त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता ती खऱ्या मालकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार केला.
सदाशिव सैंदाणे यांच्या मदतीने शोध सुरू झाला. अंमळगावचे गणेश सैंदाणे यांनी ही बाब कैलास सैंदाणे (अध्यक्ष), दिपक खोंडे यांना कळवली. पुढे सेवा निवृत्त मेजर श्री. विजय सूर्यवंशी यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. ते गणपत सैंदाणे यांचे नातलग असल्याने त्यांनी गणपत सैंदाणे यांना घेऊन येऊन दिनेश येवले यांच्याकडे पोहोचवले. पावतीवरील नावाची खात्री करून ती परत करण्यात आली आणि एका वयोवृद्ध व्यक्तीचे मोठे नुकसान टळले.
श्री. दिनेश येवले यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य आणि त्यांची सहृदयता हे खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवणारे ठरले. समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या संवेदनशील कृतीबद्दल अमळनेर नाभिक समाज अध्यक्ष कैलास सैंदाणे, सदाशिव सैंदाणे, विजयराव सूर्यवंशी आणि दिपक खोंडे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
शेवटी, “माणुसकी अजून जिवंत आहे” हे सत्य दिनेश येवले यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले.