logo

अहिल्यानगरमधील चोंडीमध्ये शिरले सीना नदीच्या महापुराचे पाणी

प्रतिनिधी २८ सप्टेंबर (अहिल्यानगर):-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यामध्ये पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून सतत चालू आहे. जामखेड तालुक्यातील सीना नदीकाठावर असलेल्या चोंडी या गावी सीना नदीला आज दुपारी मोठा महापूर आला आहे. कडा, आष्टी, पाथर्डी या ठिकाणी झालेल्या पावसाचे पाणी सिना नदीला मिळाल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे चोंडी चापडगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे त्याचबरोबर चोंडी कडून जामखेडकडे जाणारा छोटा पूल पाण्याखाली गेल्यामुळे जामखेडकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद झाला आहे. महापुरामुळे सीना नदीच्या पुराचे पाणी चोंडी गावामध्ये शिरले आहे. चोंडी मधील सर्व रस्ते पाण्याने भरून वाहत आहेत. रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. दुकानांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टी मध्ये पाणी शिरले असून त्यातील काही मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. चोंडी मधील शासकीय विश्रामगृह, सभागृह यांच्यामध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. मागील पंधरा दिवसांपासून सीना नदीला आलेला हा तिसरा महापूर आहे. महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या घरासमोर असणारे सर्व रस्ते जलमय झाले आहेत.

51
3333 views