
करगणी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – "मासिक पाळीच्या स्वच्छतेत फार्मासिस्टचा आधार" या नाट्याद्वारे जनजागृती
सातारा : (म्हसवड)
आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा यांच्यावतीने गर्ल्स हायस्कुल करगणी (ता. खानापूर) येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "मासिक पाळीच्या स्वच्छतेत फार्मासिस्टचा आधार" या संकल्पनेवर आधारित नाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये आरोग्य जनजागृती घडवून आणली.
या कार्यक्रमाला करगणी गावच्या सरपंच सौ. सुरेखाताई व्हनमाने, सदस्य श्री. मुदस्सर इनामदार, अमोल भरगर, सचिन सरगर आदी मान्यवरांसह करगणी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. प्रेमलता पुंड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फार्मसी विद्यार्थी ऋतुजा पाटील, अतुल कोळेकर, हर्षद जगदाळे, भक्ती लवटे, वैष्णवी येडगे, प्रणाली हजारे, अनुजा बावर व आकांक्षा विसापूर यांनी प्रभावी अभिनयातून मासिक पाळीतील स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर, त्याची विल्हेवाट याविषयी उपयुक्त संदेश दिला. या नाट्यप्रयोगाचे मार्गदर्शन प्रा. प्रियांका राजगे यांनी केले.
या उपक्रमामुळे मुलींमध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली असून ग्रामीण भागात फार्मासिस्टची समाजातील भूमिका ठळकपणे समोर आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. निरंजन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा यांची जनजागृती मोहीम लोकांच्या मनाला भिडली.