
Kfc kitchen
आज सुप्रसिद्ध अशा KFC खानावळ येथे भेट दिली. हॉटेल मधील स्वच्छता आणि टापटीप पना पाहून इंप्रेस झालो. बाकीच्या हॉटेलात तुम्ही गेलात की ग्राहक म्हणजे देव असल्याप्रमाणे अगोदर टेबल वर जाता, मग थाटात शिट्टी वाजवून वेटरला बोलावता, टेबल साफ कर, फॅन ऑन कर असे आदेश देता. मग ते पोरग तुमच्या सगळ्या आज्ञा पाळून झाल्यावर पुन्हा तुमच्या सेवेत हजर होत मग तुम्ही त्याला ऑर्डर देता. पण या खानावळीत तुम्हाला रेशनच्या दुकानात उभे राहिल्यासारखे उभे राहावे लागते. वेटर तुमच्याकडे येत नाही तर तुम्हाला त्याच्याकडे जावे लागते. इथले वेटर नम्र नसतात ते dine in or take away? Extra cheese? Can I make it meal? UPI or Cash असली इंग्लिश झाडून आपल्यावरच रुबाब करतात. आपल्याला पदार्थ माहित नसतील किंवा कशासोबत काय खावे याचा अंदाज येत नसेल आणि आपण थोडा वेळ थांबून स्क्रीनकडे पाहत राहिलो तर हा ऑर्डर घेणारा कर्मचारी आणि आपल्यामागे उभे असणारे जाडे, चष्मिश, गोरे गुमटे लोक " ओ भाई क्या हो रहा है? Offfoooo, kitna time yaar ? असले डायलॉग मारून आपल्याला प्रेशर मध्ये आणतात.
मला KFC चे बऱ्यापैकी नॉलेज असल्याने मी एक बर्गर आणि 4 चिकन wings मागवले. सोबत पेप्सी पण मागवली.
या 3 छटाकभर पदार्थांची किंमत 150-200 होईल असे वाटले असताना काउंटर वाल्याने four seventy nine रुपये टोटल झाल्याचे सांगितले. आता तो चारशे एकोणेंशी पण बोलू शकला असता पण गरिबाच्या मांडीतला किडा बघा..! प्रत्येक ठिकाणी इंग्लिश झाडायची आहे याला..
एवढे कसकाय हो? अशी विचारायची तलफ झालेली पण मागे एक मोकळे केस सोडलेली पोरगी kab hoga yaar is aadmi ka? असा चेहरा घेऊन उभी होती. त्या बिचारीला अजून जास्त inconvenience होऊ नये म्हणून मी खाडकन PhonePe ओपन केलं आणि धाडकन पैसे पाठवून दिले.
आपल्या रेग्युलर हॉटेलात जेवणासोबत कांदा लिंबू मीठ सगळ भरभरून देतात. या मुर्खांनी कांदा बाहेर देण्याऐवजी बर्गर मध्ये टाकून दिलेला. पाणी मागितले तर पाण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्याला म्हणलं आमच्याकडे 30 रुपयात 3 रोट्या येतात. माणसाला पाणी सुद्धा फ्री न देणाऱ्या या असल्या राक्षसी वृत्तीच्या कंपन्या किती हलकट पना करणार आहेत अजून? जेवण केल्यावर पाण्याऐवजी पेप्सी पितात का हे लोक?
लाईनीत थांबा काय? तुमच्या काउंटर वरच्या लोकांची इंग्लिशच ऐका काय!! यांचे असले नखरे बघून वाटलं जेवण झाल्यावर ताट पण आपल्यालाच उचलावे लागत असावे. तशी चौकशी काउंटर वाक्याकडे करायची इच्छा झालेली पण यावेळी काउंटर वर पोनी टेल बांधलेली पोरगी उभी होती. आजूबाजूचे लोक खाऊन झाल्यावर ताट उचलून ठेवत नाही हे पाहून जिवात जीव आला आणि मनातून kfc वाल्यांचे आभार मानले.
1 बर्गर आणि ते 4 बारके पिस 5 मिनिटात फस्त करून टाकले. 479 रुपयात आवारे मध्ये थाळी+ बिर्याणी खाऊ शकलो असतो याची आता खंत वाटू लागली...
जाताना बडीशोप आणि दात टोकरण्यासाठी काडी शोधली पण ती सुद्धा कुठे दिसली नाही. एकंदरीत अनुभव चांगला न्हवता. 479 रुपयात तुम्ही रस्सा देत नाही, भाकरी देत नाही, कांदा लिंबू ते सुद्धा देत नाही.तरी किंमती गगनाला भिडलेल्या आहेत.
एअरपोर्ट, मॉल अशा ठिकाणी या लोकांनी कब्जा केलेला आहे. आपली मराठी लोक अशी लोकेशन हेरून ठेवत नाहीत.
आमच्या येथे चुलीवर बनवलेले अस्सल गावरान चिकन/मटण मिळेल अशी पाटी जेव्हा एअरपोर्ट आणि मॉल च्या आत दिसेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने व्यवसायात प्रगती केली असे समजावे.
अजित पाटील