
नवरात्र उत्सवात अश्लील गाण्यांना बंदीची मागणी*
*विश्व हिंदू परिषद – बजरंग दल हिंगणा प्रखंडाकडून पोलीस ठाण्यात निवेदन*
आगामी नवरात्र महोत्सवात धार्मिकतेचे आणि परंपरेचे पवित्र वातावरण अबाधित राहावे, यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल,हिंगणा प्रखंडाच्या वतीने वाडी पोलीस स्टेशन, नागपूर येथे एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नवरात्रीच्या काळात निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये तसेच गरबा उत्सवांमध्ये डीजेवर अश्लील, अभद्र व फिल्मी गाणी वाजविण्यास कडक मज्जाव करण्यात यावा,अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. गरबा मंडळांनी देखील पावित्र्य राखण्यासाठी हीच भूमिका घ्यावी आणि कोणत्याही प्रकारे धर्मभावना दुखावल्या जाणार नाहीत याची हमी घ्यावी, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले.संघटनेंनी स्पष्टपणे सांगितले की, गरबा मैदानांमध्ये असामाजिक प्रवृत्तीचे लोक प्रवेश करू नयेत, तसेच महिलांवर कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी.यासाठी आयोजक समित्यांनी पोलिसांसोबत समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, अशीही सूचना करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी संघटनांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, नवरात्र महोत्सव हा सर्वांचा उत्सव असून तो शांततेत, पारंपरिक व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावा यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. तसेच आयोजकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
प्रसंगी जितेशजी गोरडे सह-मंत्री वि.हि.प उमरेड जिल्हा,रवीजी अजित वि.हि.प उपाध्यक्ष उमरेड जिल्हा,विशाल जाधव जिल्हा कोषध्यक्ष,अजय पाटणे गौसवर्धन व गौरक्षक जिल्हा प्रमुख,पवनजी बर्वे वि.हि.प मंत्री हिंगणा प्रखंड, शिवमजि राजे बजरंग दल संयोजक हिंगणा प्रखंड, संदीपजी मानकर बजरंग दल सह-संयोजक,गौरवजी उगले गौरक्षक प्रमुख,सागरजी वर्मा सह-गौरक्षक प्रमुख, सागर पटले सह-गौरक्षक प्रमुख,धनराजजी लांडगे,विशालजी जोध,कस्तुब माहुलकर,मनोजजी काटोले, आदित्य पाल,राजेशजी बनकर, हिराचंद शेंडे,नीलम देवतळे या सर्वांनी एकमताने नवरात्र उत्सव पवित्र, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राखण्यासाठी समाजाला आवाहन केले.