
गर्भधारणेनंतर बालविवाह उघड, बुलडाणा तालुक्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मोताळा (जि. बुलडाणा) : एका अल्पवयीन मुलीला बालविवाहानंतर गर्भधारणा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध मंगळवारी (ता. १६) रात्री गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या १६ वर्षे ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे जबाब दिला की, एप्रिल २०२५ मध्ये मोताळा तालुक्यातील एका गावातील सागर चंद्रसिंग कटकवार (२०) यांच्यासोबत तिचा विवाह लावण्यात आला.
पीडित मुलीच्या माहेरकडील व सासरकडील मंडळीच्या समक्ष गुजरात राज्यात हा विवाह झाला. त्यानंतर फिर्यादी ही सासरी पतीसोबत नांदायला गेली. दरम्यान, फिर्यादी व तिचा पती यांच्यात शारीरिक संबंध झाले. यातून फिर्यादीला पतीपासून गर्भधारणा झाली.
दरम्यान, वडिलांसोबत किरकोळ वाद झाल्याने पीडित बुलडाणा येथील सखी वन स्टॉप येथे आली. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी झाली असता, ती गर्भवती असल्याचे समजले. यावरून बोराखेडी पोलिसांनी पीडित मुलीचा पती, सासरा आणि वडील या तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले, पोकाँ श्रीकांत चिंचोले करीत आहेत.