logo

बारा खुनात सहभाग असलेल्या कमांडर सुनितासह ललिता ठार चौदा लाख इनाम, माओवाद्यांना हादरा

बारा खुनात सहभाग असलेल्या कमांडर सुनितासह ललिता ठार
चौदा लाख इनाम, माओवाद्यांना हादरा

By दिपक चुनारकर -September 18, 2025


गडचिरोली : माओवाद्यांच्या एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांबिया) दलमची कमांडर असलेल्या सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी (38 वर्ष) आणि एरिया कमिटी मेंबर (एसीएम) ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा (34 वर्ष) या दोघी बुधवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्या. सुनितावर 8 लाखांचे तर ललितावर 6 लाखांचे, असे दोघींवर मिळून 14 लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. एके-47, पिस्तुल अशा आधुनिक शस्रांसह वावरणाऱ्या त्या दोघींवर अनेक खून, चकमकी, जाळपोळ यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवण्याच्या उद्देशाने गट्टा दलमचे काही माओवादी दबा धरुन बसले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या अहेरी येथून तातडीने सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आल्या होत्या. तसेच अभियानादरम्यान पोस्टे गट्टा (जां.)चे पोलीस पथक व सीआरपीएफ 191 बटालियनच्या पथकाकडून सदर जंगल परिसरात घेराव करण्यात आला.

यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार सुरु केला. पोलिसांनी माओवाद्यांना शस्त्र खाली ठेऊन शरण येण्याचे आवाहन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 2 जहाल महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. ते मृतदेह हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणून त्यांची ओळख पटविण्यात आली.

दोघींवरही अनेक गंभीर गुन्हे

सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी ही मूळची अहेरी तालुक्यातील मडवेली गावची असून ती गट्टा दलम कमांडर म्हणून काम पाहात होती. तिच्यावर चकमकीचे 14, खुनाचे 12, जाळपोळ 3 आणि इतर 2 असे 31 गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने तिच्यावर 8 लाखांचे इनाम ठेवले होते.

ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा ही मूळची नेलटोला, ता.पाखांजूर, जि.कांकेर (छ.ग.) येथील रहिवासी असून ती गट्टा दलममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम पाहात होती. ती गट्टा दलम डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती. तिच्यावर चकमकीचे 8, खुनाचे 4, जाळपोळीचा 1 आणि इतर 1 असे 14 गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर 6 लाखांचे इनाम होते. पोलिसांनी घटनास्थळावरून 1 एके-47 रायफल, 1 अत्याधुनिक पिस्तुल, जिवंत काडतूस, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत केले.

हे अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सिआरपीएफ कमांडंट 191 बटालियन सत्य प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात सी-60 पथक, गट्टा (जां.) पो.स्टे.चे पथक आणि सिआरपीएफच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले.

सदर अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि सर्व जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी संपूर्ण अभियानाची देखरेख करुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, सी-60 प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनि.राहुल देवडे यांच्यासह सी-60 गडचिरोली आणि प्राणहिताचे इतर अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

7
4081 views