
नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.
गडचिरोली, (ता. अहेरी) – नागेपल्ली गावातील सार्वजनिक श्मशानभूमीवर अंतिम संस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, १५-२० वराह (डुक्कर) पालन करणारे अतिक्रमणकार यांनी श्मशानभूमीवर बेकायदेशीर कब्जा करून ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करू न देण्याचा प्रयत्न केला. अडवणुकीदरम्यान त्यांनी धमक्या देत शिवीगाळ केली आणि हातोडी, काठ्या तसेच तलवारीसारख्या घातक शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात भीमराव विठ्ठल गुरनुले आणि आकाश गुरनुले गंभीर जखमी झाले आहे. तसेच प्रदीप ठाकरे, रोहित गुरनुले, श्रीहरि व दशरथ निकोडे यांना देखील मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, या श्मशानभूमीवरील अतिक्रमणाबाबत पूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, अतिक्रमणकारांना पोलिस प्रशासनाची भीती नसल्याने त्यांनी पुन्हा कब्जा करून कायद्याचा सरळसरळ अनादर केला आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या वतीने अहेरी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार सादर करण्यात येणार असून, दोषींवर कठोर गुन्हे नोंदवून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गावातील शांतता राखण्यासाठी व सार्वजनिक श्मशानभूमीचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.