
पाण्यासाठी वहागांवकरांचा हंडा मोर्चा
आठ दिवसात सलग दुसरा मोर्चा,पाणी न मिळाल्यास संपूर्ण गावाचे पाणी बंद करण्याचा ग्रामपंचायतीला इशारा
वहागांव (ता.कराड) येथील विठ्ठल वार्डमधील महिला,ग्रामस्थांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील महिला,ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात एकत्रित येऊन आज ग्रामपंचायतीला टाळा ठोकण्याचा इशारा देत ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.
महिला, ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या सुजाता पुजारी पांच्याकडे दिले होते. येथील पाणीप्रश्नाबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर काही ठोस उपाययोजना झाली नसल्याने महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.
याबाबत आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी, विठ्ठल वॉर्ड परिसर, ग्रामपंचायत परिसर व मातंग वरती या ठिकाणी गेल्या अनेक हे दिवसांपासून अतिशय संथ गतीने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिला, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना तर रात्रीच्या एक-एक, दोन-दोन वाजता पाणी भरावे लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी केवळ मत मागण्यासाठी येतात. त्यांना ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाचे काहीही देणेघेणे नाही. विठ्ठल वॉर्डमधील ग्रामस्व सातत्याने गेल्या तीन वर्षांपासून येथील पाणीप्रश्न निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र त्यात ग्रामपंचायतीला अद्याप यश आलेले नाही. ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर केवळ आठ ते दहा दिवस भरपूर प्रमाणात पाणी येते. त्यानंतर 'मागचे पाढे पंचावन्न अशी अवस्था असते, असेही निवेदनात म्हटले होते.
पाणीप्रश्नावरून संतप्त झालेल्या काही महिला व ग्रामस्थ सोमवारी पाण्याचे रिकामे हांडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलनात सहभागी झाले होते. पाणीप्रश्नाबाबत कायमस्वरुपी उपाययोजना झाल्या नाही,तर यापुढे आंदोलनाची दिशा बदलू तसेच आतापर्यंतची पाणीपट्टी भरणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी माजी सरपंच संग्राम पवार यांना सांगितले. तसेच आठ दिवसांत पाणीप्रश्नांबाबत कायमस्वरुपी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर संपूर्ण गावाचे पाणी बंद करू तसेच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. विठ्ठल वार्ड मधील ग्रामस्थांची यापूर्वीची पाणीपट्टी माफ करावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे आंदोलनकर्ते वैभव पवार यांनी सांगितले.