
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.
जव्हार प्रतिनिधी-
ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद पालघर तथा पंचायत समिती जव्हार यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह, जव्हार येथे करण्यात आले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय सुकदेव चित्ते, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती जव्हार हे होते. यावेळी व्यासपीठावर कल्पेश राऊत (सरपंच प्रतिनिधी), अनिता चौधरी (सरपंच महिला प्रतिनिधी), मनोहर उमतोल विस्तार अधिकारी ग्रामपंचायत , प्रसाद पाटील (संचालक, स्वदेश फाऊंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी सदर अभियानाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, विविध घटक, अभियानाचा कालावधी तसेच अभियान दरम्यान ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांनी पार पाडावयाच्या भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर सदर अभियांना विषयी संखोल माहिती उपस्थित सर्व सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली.
त्यानंतर स्वदेश फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पाटील यांनी फाऊंडेशनच्या ग्रामीण विकासासाठी सुरू असलेल्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. मोहन चव्हाण (बुधानी ट्रस्ट) यांनी संस्थेच्या उपक्रमांची ओळख करून दिली व ग्रामविकास प्रक्रियेत अशा संस्थांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, पेसा मोबाईलायझर, ग्रामरोजगार सेवक तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुका पातळीवर अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी दिशा मिळाल्याचे समाधान सर्वत्र व्यक्त करण्यात आले.शेवटी वंदे मातरम गीताने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.