
“गणेश उत्सवानिमित्त धुळदेवमध्ये वृक्षारोपण – API अक्षय सोनवणे यांच्या नावाने झाड लावले”
माण तालुक्यातील धुळदेव येथील नवतरुण बिरोबा गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारा विशेष उपक्रम राबवण्यात आला. उत्सव काळात वृक्षारोपण करण्यात आले असून त्यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नवतरुण बिरोबा गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक गजी नृत्य, कीर्तन, भजन, धनगरी ओव्या, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. डीजेवर बंदी असतानाही मंडळाने पारंपारिक वाद्यांचा वापर करत उत्सव रंगतदार आणि सांस्कृतिक ठेवला. “आपली परंपरा जपून उत्सव साजरा करणे हेच खरे उत्सवाचे वैशिष्ट्य आहे,” असे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
उपस्थित नागरिकांनी पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक जतन या दोन्ही संदेशांचे स्वागत केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत सांगितले,
“गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा नाही, तर सामाजिक जाणीवेचा आणि संस्कृती जपण्याचा पर्व आहे. नवतरुण बिरोबा गणेश मंडळाने पर्यावरण संवर्धन आणि पारंपारिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे काम केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
नवतरुण बिरोबा गणेश मंडळाचे सदस्य म्हणाले की, “गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा पर्व आहे. यंदाही पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा संगम साधून उत्सव अधिक अर्थपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला.”