logo

कोकण रेल्वेची रो-रो सेवा योजना फसली!

प्रतिनिधी. विश्वनाथ भगत (रायगड )

मुंबई : कोकणात गेलेल्या गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या कार रो रो सेवेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना अक्षरशः फसली आहे. पहिल्या फेरीत अवघ्या चार कार आणि १९ प्रवासी घेऊन ही सेवा रवाना झाली. दरम्यान, परतीसाठी मात्र एकही नोंदणी झालेली नाही.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते. रस्त्यावरची कोंडी टाळण्यासाठी कोकण रेल्वेने कार रो रो सेवा सुरू केली होती. विशेष रेल्वेसोबतच गाड्यांसाठी वेगळी डब्यांची सोय करण्यात आली होती; मात्र या प्रयोगाला अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही. २३ ऑगस्ट रोजी कोलाड (रायगड) येथून वेर्णाकडे (गोवा) ही रेल्वे धावली. ४० कार नेण्याची क्षमता असतानाही केवळ चार कारची नोंदणी झाली होती. त्यानंतर आता कोकणातून मुंबईकडे परतताना कार रो रोसाठी एकही नोंदणी झाली नाही..
रो-रो सेवेचे प्रतिकार भाडे जवळपास आठ हजार रुपये असून, स्वतंत्र तिकीट घ्यावे लागत होते. तसेच गाडी संध्याकाळी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचत असल्याने वेळेच्या दृष्टीने ती फारशी सोयीची नव्हती. रस्त्याने प्रवास केल्यास कमी खर्च येतो, ही बाबही प्रवाशांच्या निर्णयामागे ठळकपणे दिसून आली. या सेवेसंदर्भात पुरेशी जाहिरात झाली नाही. त्यामुळे अनेकांना कार रो रोची माहितीच मिळाली नाही, आधी माहिती मिळाली असती तर आम्ही वापर केला असता, असे काही वाहनधारकांचे म्हणणे आहे.

26
1456 views