
नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात, शिक्षक दिन उत्साहात साजरा
अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती माता व आद्य शिक्षक सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन श्री पी डी चौधरी सर, इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे नियोजन श्री सी जी परदेशी सर, अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे नियोजन श्री एम एम पाटील सर यांनी केले होते. सकाळ सत्रात इयत्ता अकरावी मधून प्रथम आलेला विद्यार्थी नंदकिशोर ठाकरे याने मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले, तर नववीच्या वर्गातून प्रथम आलेली विद्यार्थिनी दामिनी पवार हिने उपमुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहिले नववीच्या वर्गातून द्वितीय आलेल्या दिव्या वसंत पाटील या विद्यार्थिनीने पर्यवेक्षिका म्हणून कामकाज पाहिले. दुपार सत्रात साई सुनील महाजन या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांची भूमिका बजावली, समृद्धी पाटील या विद्यार्थिनीने उप मुख्याध्यापकांची भूमिका बजावली आणि चेताक्षी महाजन या विद्यार्थिनीने पर्यवेक्षिका म्हणून कामकाज पाहिले. सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता आठवीच्या आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून कामकाज पाहिले. त्यांची कामकाजाची तयारी, त्यांच्यातील उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिक्षकांसोबतच काही विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर बंधूंची देखील भूमिका अतिशय नियोजन पूर्ण रीतीने निभावली. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या गुरुजनांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा स्वागत सत्कार देखील केला यावेळी सकाळ सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस ए सावळे सर होते. मंचावर पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर उपस्थित होते. दुपार सत्रात अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर होते. मंचावर ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही एल राठी सर उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले, तसेच जीवनात यशस्वी व्हा, खूप अभ्यास करा आपले आपल्या आई-वडिलांचे आणि शाळेचे नाव मोठे करा असा संदेश दिला. दुपार सत्रात श्री व्ही एल राठी सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चला यश हमखास प्राप्त होईल असा संदेश दिला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर यांनी प्रशासन सांभाळणे कसे अवघड असते ते आजच्या मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांनी अनुभवले असेल हे सांगून पुढे असेच यशस्वी व्हा आणि त्या पदांपर्यंत पोहोचा जीवनात उत्तुंग भरारी घ्या असा मौलिक संदेश दिला. सकाळ सत्रातील श्री एस ए सावळे सर यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना संदेश पर सांगितले की आज जशी तुम्ही शिक्षकांची भूमिका निभावली ते काम किती कठीण आहे याची जाणीव ठेवून तुम्ही शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गावर चला, खूप अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा असा संदेश दिला. सकाळ आणि दुपार सत्रातील सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. खरोखरच आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आमचे गुरु दीपस्तंभ आहेत असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सकाळ सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सी जी परदेशी सर यांनी केले तर दुपार सत्रात प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री पी डी चौधरी सर यांनी केले दोन्ही सत्रातील छायाचित्रणाचे कामकाज श्री एस डी खोडपे सर, श्री एस आर महाजन सर, श्री एस के मगरे सर, श्री एस ए हळदेसर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.