logo

मांडवीत गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम रोग निदान व रक्तदान शिबिरातील 70 रुग्णाना उपचार 32 रक्तदात्यांनी दिला जीवनाचा संदेश

नागपूर
जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी


मांडवी, ता. कळमेश्वर, ३ सप्टेंबर २०२५ – सणासुदीच्या काळात गावोगाव केवळ उत्सव साजरे होतात, पण कळमेश्वर तालुक्यातील मांडवी गावातील गणेश उत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकीचे नवे उदाहरण घालत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामुळे गावात आरोग्य आणि समाजकारणाची जाणीव जागवली गेली.

या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. मनोहररावजी कुभांरे, भाजपा ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष श्री. विजय ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन गेंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शिबिरात तब्बल ७० रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. गावोगाव दवाखान्याअभावी अनेकांना उपचार मिळत नाहीत, अशा वेळी या शिबिराने गरीब-शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे, ३२ तरुणांनी रक्तदान करत समाजासाठी जीवदानाचा संदेश दिला. रक्तदात्यांचा उत्साह पाहून उपस्थित पाहुणे व नागरिकांनी दाद दिली.

या उपक्रमाचे आयोजन गणेश मंडळाचे अध्यक्ष रविंद्र धारने, उपाध्यक्ष मनीष पावडे, सचिव दिनेश ठोंबरे यांनी केले होते. त्यांना अमोल धारने, अंकित बरे, विलास जेबरे, बाबारावजी जुनघरे, मदेश ठोंबरे, प्रज्वल ओकाक, सुशिल आंबुलकर, सुशिल ठोंबरे, नमेश बेले, गणेश बेले, यश बेल, विनोद डोके, चंद्रभान पावने, उमेश वाघ, स्वप्निल बरे, प्रवीण नंबर, अमित नेबर, शुभम पावडे, विनित गहुकर आदी कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य केले.

गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. “गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून समाजजागृतीचा उत्सव असावा, याचा खरा अर्थ मांडवी गणेश मंडळाने उलगडून दाखवला आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

सणासुदीच्या गोंगाटात सामाजिक भान जपणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमामुळे मांडवी गावाचा आदर्श तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात झळकला आहे.

246
4987 views