logo

सुरजागड–गट्टा रस्ता मृत्यूचा सापळा! अडेंगे–नेडर येथे एस.टी. बस अडकल्याने प्रवाशांचा थरकाप, जनतेचा संताप उसळला.

एटापल्ली :
सुरजागड–गट्टा मार्ग पुन्हा एकदा मृत्यूच्या दाराशी घेऊन गेला. आज अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात अडकली. बसमधील प्रवाशांचा जीव थरारला, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.

दररोज शेकडो प्रवासी या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करतात. खड्डेमय व धोकादायक स्थितीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून हा मार्ग प्रवाशांसाठी “मृत्यूचा सापळा” ठरू लागला आहे.

भाकपाचे जिल्हा सहसचिव तथा AIYF चे राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले –
“जनतेचा जीव धोक्यात टाकून सरकार सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढते, पण स्थानिकांसाठी सुरक्षित रस्ताही देऊ शकत नाही. हा सरळ सरळ जनतेच्या श्रम व जीवनावरचा अन्याय आहे. जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही मान्य करणार नाही.”

ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, सरकार व लोकप्रतिनिधी रस्त्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे प्रवासी व गावकरी रागावले असून संघर्षाशिवाय रस्ता सुटणार नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, “रस्ता द्या, विकास द्या – अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही” या घोषणा देत भाकपाने इशारा दिला आहे की, 15 सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

9
388 views