logo

लोणंद नगरपंचायत हद्दीतील सिटी मुख्याधिकारी यांच्या मनमानी गैरकारभाराची चौकशी व्हावी; शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करावी – कय्युम मुल्ला



सातारा दि.__ – लोणंद नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या मनमानी, अनागोंदी व गैरकारभाराबाबत साथ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कयूम मुल्ला यांनी जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांच्याकडे पुराव्यासह निवेदन सादर करत सखोल चौकशीची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, लोणंद नगरपंचायत हद्दीतील सिटी सर्व्हे नं. 282/316, क्षेत्रफळ 1488.70 चौ.मी. या सरपंच ग्रामपंचायत लोणंद नावे असलेल्या जागेवर तत्कालीन ग्रामपंचायतने राजीव गांधी शॉपिंग सेंटर नियमबाह्य पद्धतीने उभारले. हे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण रेषेला बाधक असून आवश्यक अंतर व परवानग्या न घेता केले गेले आहे. तरीदेखील मुख्याधिकारी यांनी शासनाची दिशाभूल करून ही इमारत नगरपंचायत मालकीची दाखवून गाळ्यांचा भाडेकरार निश्चित केला आणि ई-लिलाव प्रक्रिया राबवली.

मुल्ला यांनी आरोप केला की, आरक्षित गाळ्यांचा लिलाव संशयास्पदरीत्या रद्द करून फेर ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. लिलाव रद्द करण्याची ठोस कारणे व कागदपत्रे नगरपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत बेरोजगार सेवा संस्था, अपंग, विकलांग यांना शासनातील आरक्षणाच्या तरतुदींचा भंग झाला असून नागरिक व सेवा संस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

निवेदनात आणखी म्हटले आहे की, मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामांना नियमबाह्य मंजुरी दिली, रस्ता नसताना व परवानग्या न घेता बांधकाम परवाने दिले. तसेच विकासकामांच्या इस्टिमेटमध्ये फुगीर आकडे दाखवून शासन निधीचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कय्युम मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की –

मुख्याधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळताच शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करावी.

गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देऊन ती रद्द करावी.

नागरिक व सेवा संस्थांचे झालेले आर्थिक नुकसान मुख्याधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून भरपाई द्यावी.

विकासकामांची व निधीच्या खर्चाची विशेष तज्ञ समितीमार्फत चौकशी करून पारदर्शकता आणावी.


सदर निवेदनाची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे लोणंद शहरात चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.


9
802 views