
पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांना नागरिकांची मागणी – लोकल फिरताना पोलीस ताफा घेऊ नये
सातारा :
सातारा शहरातील नागरिक व व्यापार्यांकडून अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या की जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई हे स्थानिक ठिकाणी फिरताना मोठा पोलीस ताफा घेऊन फिरतात. यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. नुकताच या संदर्भात पुरावा समोर आल्याने आज नागरिकांच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री कोयना बंगला (पोवई नाका, सातारा) येथे वास्तव्यास आहेत. ते सातारा शहरातील पंचमुखी गणपती, गरेचा गणपती, समर्थ मंदिर, दत्त मंदिर यांसारख्या धार्मिक ठिकाणी वा वैयक्तिक कामांसाठी जात असले तरी त्यांच्यासोबत १२ ते १५ पोलिसांचा ताफा असतो. एका मंत्र्यासाठी एवढे पोलीस वापरणे योग्य नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
पोलीस यंत्रणेत मनुष्यबळ कमी असून, तपासणी, गुन्ह्यांची चौकशी, वाहतूक नियंत्रण, वेरिफिकेशन यांसारखी अनेक कामे प्रलंबित असताना एवढा मोठा ताफा मंत्र्यांच्या सेवेत गुंतवणे अयोग्य असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. बलात्कार, विनयभंग, अमली पदार्थ, गुटखा, तंबाखू यांसारखे गुन्हे वाढत असताना पोलिसांची शक्ती अशा वैयक्तिक कामांवर खर्च होऊ नये अशी नागरिकांची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकल ठिकाणी फिरताना पोलीस ताफा घेण्यास नकार दिला होता. त्याच धर्तीवर पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनीही नागरिकांच्या सोयीचा विचार करून व शासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस ताफा वापरणे टाळावे, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.