logo

जांबिया ग्रामपंचायत कार्यालय कायम बंद – ग्रामस्थांचा रोष, भाकपाकडून निवेदन.

एटापल्ली (प्रतिनिधी) : एटापल्ली | जांबिया ग्रामपंचायत कार्यालयातील कारभार ठप्प झाल्याने गावातील शेकडो नागरिकांना शासकीय सेवांसाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवक व कर्मचारी कायम अनुपस्थित असल्यामुळे जन्म-मृत्यू दाखले, रेशनसंबंधित प्रमाणपत्रे, निवडणूक नोंदणी, शासकीय योजनांचे अर्ज, मनरेगा कामगारांची हजेरीपत्रके यांसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत.

ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत ठामपणे सांगितले की, “कर्मचारी उपस्थित नसतील तर ग्रामपंचायत कार्यालयाचा उपयोग काय?” प्रशासनाने या निष्काळजीपणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाकपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

ग्रामस्थांचे थेट उद्गार
रामदास उसेंडी यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “ग्रामपंचायत कार्यालयात गेलो की अनेकदा कुलूपच लावलेले असते. एका प्रमाणपत्रासाठी आठवड्यात दोन-तीनदा फेऱ्या माराव्या लागतात. वेळेवर सेवा मिळत नसल्याने आम्ही वैतागलो आहोत.”

तर हरिदास गावडे म्हणाले, “घरकुल व पाणी समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कार्यालयाकडे लक्षच नाही.”

निवेदन गटविकास अधिकाऱ्यांकडे
या गंभीर परिस्थितीबाबत भाकपा गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले. त्यात ग्रामसेवकाने मुख्यालयी राहून आठवड्यातील सर्व कार्यदिवशी कार्यालय सुरु ठेवावे व नागरिकांच्या सेवेत नियमितपणे उपस्थित राहावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या निवेदनाला कॉ. सुरज जककुलवार (AISF जिल्हा संयोजक), कॉ. रामदास उसेंडी (AIKS संपर्क प्रमुख), कॉ. राकेश होळी, कॉ. हरिदास गावडे, कॉ. यशवंत कोवासी व कॉ. सुधाकर हेडो आदी कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला.

नागरिकांची अपेक्षा – तात्काळ कारवाई
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत कार्यालय हे गावकऱ्यांचे प्राथमिक प्रशासनिक केंद्र असून येथील अनियमित कारभारामुळे शासकीय योजनांचा लाभ, रोजगार व आवश्यक प्रमाणपत्रे थांबलेली आहेत.

त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून ग्रामपंचायत कार्यालय सुरु ठेवावे, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

0
108 views