logo

भटके-विमुक्त समाजाच्या सन्मानाचा दिवस गोंदवले येथे उत्साहात साजरा






भटके-विमुक्त समाजाच्या सन्मानाचा दिवस गोंदवले येथे उत्साहात साजरा

महाराष्ट्र -(सातारा म्हसवड ):प्रतिनिधी
भटके-विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय आणि सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके-विमुक्त दिवस’ म्हणून जाहीर केला असून या निर्णयाचा ऐतिहासिक ठसा आज गोंदवले बुद्रुक येथे उमटला. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात समाजाचा संघर्ष, योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांचे जणू दर्शनच घडले.

भटके-विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील तसेच राष्ट्रउभारणीतील मोलाचे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके-विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या निर्णयामुळे समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान व प्रतिष्ठेला बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय समाजासाठी केवळ प्रतीकात्मक न ठरता त्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर गोंदवले बुद्रुक येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत ‘भटके-विमुक्त दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेमध्ये भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनमूल्ये व परंपरांचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले. मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे वातावरण आनंदी व प्रेरणादायी झाले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सातारा यांच्या सहाय्यक संचालक कांचन जगताप, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, आश्रमशाळेचे संचालक सूर्यकांत उर्फ बाळासाहेब माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवलेचे माजी सरपंच विष्णुपंत कट्टे-पाटील, भाजप युवामोर्चा माण तालुका सरचिटणीस राहुल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याद्वारे भटके-विमुक्त समाजाचा संघर्ष, त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील व राष्ट्रउभारणीतील वाटा आणि सामाजिक न्याय व हक्कांसाठी चालविलेल्या चळवळींचा ठसा उपस्थितांच्या मनावर उमटविण्यात आला. भटके-विमुक्त दिवसाच्या निमित्ताने समाजाचा आत्मसन्मान वृद्धिंगत होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणखी बळकटपणे सामील होण्याची संधी मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



12
935 views