
भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे
सातारा, दि. ३१ –
भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळ व राष्ट्र उभारणीतले योगदान लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आयोजित कार्यक्रमात गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भटके विमुक्त दिवस’ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमादरम्यान भटके विमुक्त समाजाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम सादर केले. या उपक्रमांची पाहणी करून गोरे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
या प्रसंगी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कांचन जगताप, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, संत गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक सूर्यकांत माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवले सरपंच विष्णुपंत कट्टे पाटील, राहुल भोसले, तसेच शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.