logo

मंगलउत्सवात भाविकांची परीक्षा – पेट्रोलपंप परिसर खड्ड्यांनी पोखरला"


"मंगलउत्सवात भाविकांची परीक्षा – पेट्रोलपंप परिसर खड्ड्यांनी पोखरला"



अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)–
अमळनेर बसस्थानकापासून मंगलग्रह मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, विशेषतः पेट्रोलपंप परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक वाहनचालकांच्या गाड्या त्यात अडकल्या. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होऊन वाहनचालकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत मराठी लाईव्ह न्युजला बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषदेकडे चौकशी केली असता, मुख्याधिकारी यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नगरपरिषदेकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
धार्मिक दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मंगलग्रह मंदिर अमळनेरात असून, सध्या येथे भव्य मंगलउत्सव सुरू आहे. या कार्यक्रमाला मंत्री, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नागरिकांनी या रस्त्यावरील खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी" अशी मागणी केली आहे. पर्यावरणप्रेमी दिलीपराव सोनवणे यांनी सांगितले की, "मंगलग्रह मंदिराकडे जाणाऱ्या पेट्रोलपंप टर्नपासून पैलाड चौकापर्यंत तब्बल पंचवीस खड्डे आहेत. भाविकांच्या सोयीसाठी व अपघात टाळण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत."


चौकट

परवा संध्याकाळी शाळेतून येतांना भर पावसात रस्त्यावर पेट्रोल पंपच्या समोर खड्डे असल्यामुळे लक्षात आले नाही गाडी त्या खड्ड्यांमध्ये पडल्याने हाताला लागले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा लक्ष देणार.. अजून काही अपघाताची याची वाट पाहत आहे का?

एक वाहनचालक अमळनेर

12
257 views