logo

'डायट'चा सर्वांगीण विकास करणार - पालकमंत्री संजय राठोड.



लेखनिक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव

यवतमाळ – जिल्ह्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक धरोहर असलेल्या येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे (डायट)चे शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातील मातृसंस्था असलेल्या ‘डायट’चा सर्वांगीण विकास करून संस्थेचे शैक्षणिक महत्व कायम राखले जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या इमारतीच्या नूतनीकरण व विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत हाते.

कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. देवानंद सावरकर, डॉ. रमेश राऊत, कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते आदी उपस्थित होते.

दहावी, बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. पडद्यामागे राहून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार ठरलेल्या या लेखनिकांच्या निःस्वार्थ सेवेमुळे अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे कौतुकोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी काढले. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीत गुणांकनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी शिक्षण विभागाला यावेळी दिले. लवकरच या संदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संजय राठोड यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याची बॅग भेट देण्यात आली.

संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा कायापालट झाला. कोविड काळात या संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी राबविलेला ‘शाळा आई-बाबांची’ हा उपक्रम आकाशवाणीवरून देशभर गाजला, तर ‘फिजिओथेरपी घराघरात’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे यवतमाळ जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले, असे गौरवोद्गार मंत्री राठोड यांनी काढले. संस्थेचे राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करून ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या साधन व्यक्तींनी सेवेत कायम करण्याची मागणी पालकमंत्री राठोड यांच्याकडे केली. समग्र शिक्षा अंतर्गत सुमारे दोन हजार ५०० विषय साधनव्यक्तींना कायम सेवेत घेण्याबाबत लवकरच शिक्षण विभागाशी चर्चा करून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. यवतमाळ डायटमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या शिशुकरीता येथे सर्वप्रथम हिरकणी कक्ष (मॉम अँड किड्स कंफर्ट झोन) सुरू करण्यात आला, याबद्दल पालकमंत्र्यांनी डायटच्या अधिव्याख्यात्यांचे कौतुक केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे हे उद्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. प्रशांत गावंडे यांच्यासारखे क्रियाशील व्यक्ती कधीच निवृत्त होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच शैक्षणिक क्षेत्रातील मोठी जबाबदारी टाकण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी सेवानिवृत्त होत असलेले डॉ. देवानंद सावरकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी केले. संचालन शुभांगी भोयर यांनी तर आभार अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ यांनी मानले. कार्यक्रमास भाऊराव राठोड, मधुमती सांगळे, सारिका पवार तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षक, सिखें, अगस्त्या, हुमाना आदी संस्थाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

9
282 views