
पळसपची ग्रामसभा ठरली वादळी– बोगस कामांमधून लाखोंचा गैरवापर, ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर बोगस सह्या झाल्याचे सरपंचांचे उत्तर
पळसप(धाराशिव);
विकासकामांसाठी शासनाकडून आलेला निधी पारदर्शकपणे वापरला जावा, यासाठी ग्रामसभा ही सर्वांत महत्त्वाची मंच मानली जाते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांवरून मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामस्थांनी घंटा गाडी, कचराकुंड्या, हँडवॉश स्टेशन, सॅनिटरी नॅपकिन मशीन, धूर फवारणी यंत्र, शाळा व अंगणवाडी साहित्य खरेदी, शाळा व आरोग्य केंद्र गेट दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, शौचालय बांधणी यांसारख्या कामांची माहिती मागितली. पण प्रत्यक्षात ही कामे कागदोपत्री पूर्ण दाखवली असली तरी गावात कुठेही त्याचा मागमूस दिसून आला नाही. पाणीपुरवठा अजूनही ठप्प आहे.
यावरून ग्रामस्थांनी ग्रामसभेत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना थेट प्रश्न विचारले. “कामे झालीच नाहीत, मग निधी कुठे गेला? शेकडो रुपये कशाच्या नावाखाली खर्च दाखवला?” अशा टोकाच्या प्रश्नांनी ग्रामसभा तापली.
परंतु आश्चर्य म्हणजे, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. उलट, त्यांनी विषय चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकही ठोस कागदोपत्री पुरावा न दाखवता बैठक आटोपल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या सर्व प्रकरणामुळे लाखो रुपयांच्या निधीचा बोगस खर्च झाल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे. गावकरी आता जिल्हा परिषद आणि तहसील प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “गावाचा विकास करण्यासाठी शासन पैसा देतं, पण तोच पैसा काही मंडळींच्या खिशात जात असेल तर विकासाचे स्वप्न अधुरेच राहणार. यावर चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
"अवैध दारू विक्री बंद करा म्हणून वारंवार प्रश्न उपस्थित केला असला तरी दारू बंदी च्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे तरूणाई दारूच्या आहारी जात असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली"