
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
Aima Media news chandrapur
राजुरा :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर यांच्या अधिपत्याखालील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे आज दि. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल विशेष उपस्थित होते. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नवीन शैक्षणिक प्रणाली अंतर्गत ओपन इलेक्टिव्ह (ओई) स्पोर्ट्स योगा विषयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष उपक्रमांचे आयोजन केले. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी व क्रीडायशः विषयी माहिती देण्यात आली. भारताला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यानंतर ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. लगोरी, कंचे, गुलेल निशाणा, स्लो सायकलिंग, स्लो वॉकिंग, गिल्ली-डंडा, पोत्यांची शर्यत या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक खेळ कसा खेळायचा, त्याची नियमावली व खेळाचा आनंद या सर्व गोष्टी प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आल्या. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही खेळांमध्ये सहभागी होत आनंद लुटला. क्रीडा स्पर्धांतून विद्यार्थ्यांत मैत्रीभाव, संघभावना, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश पोहोचविण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व ओपन इलेक्टिव्ह स्पोर्ट्स योगा विषयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.