logo

कोपर्शी चकमकीत अहेरी दलमचा खात्मा – गडचिरोली पोलिसांचा मोठा पराक्रम.

गडचिरोली, 27 ऑगस्ट 2025
महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या तुफानी माओवादविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अहेरी दलमसह चार जहाल माओवादी ठार करण्यात आले असून यामध्ये एका पीपीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरचा समावेश आहे. या चौघांवर मिळून 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सी-60 च्या 20 पथकांबरोबरच CRPF QAT च्या दोन तुकड्यांनी 25 ऑगस्टपासून कोपर्शी परिसरात शोधमोहीम सुरू केली. अवघड डोंगराळ जंगल, सततचा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी सलग दोन दिवस मोहीम चालू ठेवली. 27 ऑगस्टच्या सकाळी माओवादी दहशतवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र माओवादी अधिक आक्रमक झाले. प्रत्युत्तरादाखल आठ तास झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर पोलिसांनी चार माओवादी दहशतवाद्यांचा खात्मा केला.


ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख :

1. मालु पदा (41, छत्तीसगड) – पीपीसीएम, कंपनी क्र. 10 दलम, बक्षीस ₹6 लाख, 8 गंभीर गुन्हे दाखल.

2. क्रांती ऊर्फ जमुना हलामी (32, गडचिरोली) – कंपनी क्र. 10 सदस्य, बक्षीस ₹4 लाख, 27 गुन्हे दाखल.

3. ज्योती कुंजाम (27, छत्तीसगड) – अहेरी दलम सदस्य, बक्षीस ₹2 लाख, 8 गुन्हे दाखल.

4. मंगी मडकाम (22, छत्तीसगड) – गट्टा दलम सदस्य, बक्षीस ₹2 लाख, 3 गुन्हे दाखल.


जप्त शस्त्रसाठा :

01 SLR रायफल

02 INSAS रायफल

01 .303 रायफल

92 जिवंत काडतुसे

03 वॉकीटॉकी

या कारवाईत अहेरी दलमचा संपूर्ण खात्मा झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यानंतर गडचिरोली जिल्ह्यात केवळ 25 माओवादी शिल्लक असल्याचे समजते.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

या मोहिमेचे मार्गदर्शन अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, परिक्षेत्रीय उप-महानिरीक्षक अंकित गोयल व CRPF DIG (अभियान) अजयकुमार शर्मा यांनी केले. प्रत्यक्ष नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांनी केले तर सी-60 प्राणहिता प्रभारी सपोनि. राहुल देवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.


माओवादाविरोधी कारवाईतील सलग यश

गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे 2021 पासून आतापर्यंत 91 माओवादी ठार, 128 अटकेत तर 75 जणांनी आत्मसमर्पण केले आहेत. या शौर्यपूर्ण यशाबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादी कार्यकर्त्यांना शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत, गडचिरोलीत माओवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

17
2357 views