
पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.
गडचिरोली, 27 ऑगस्ट 2025 :- गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सोमवारी झालेल्या प्रचंड चकमकीत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले असून तीन महिलांसह एकूण चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीनुसार गडचिरोली विभागातील गट्टा दलम व कंपनी क्र. 10 चे माओवादी कोपर्शी परिसरात दबा धरून बसल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील 19 C-60 पथके व CRPF QAT च्या 2 पथकांनी जंगल परिसरात मोठी शोध मोहीम राबवली.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे आव्हानात्मक परिस्थितीत पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली. आज सकाळी पथके परिसरात दाखल होताच माओवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसर ताब्यात घेतला.
चकमक संपल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहीमेत 01 पुरुष व 03 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल आणि 01 .303 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी अभियान सुरूच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.