logo

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला महाराष्ट्र शासनाकडून 41 कोटींच्या भरीव निधीस मान्यता

राहुरी विद्यापीठ, दि. 26 ऑगस्ट, 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, अतिथीगृह आणि कर्मचारी निवासस्थानाकरिता 40 कोटी 91 लाख 11 हजार रुपये एवढ्या भरीव निधीस शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या या यशामागे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री व सध्याचे क्रीडामंत्री ना. अॅड. माणिकराव कोकाटे, मंत्री कृषि ना. श्री. दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, कृषिच्या उपसचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांचे सहकार्य, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे आणि विद्यापीठ अभियंता इंजि. मिलिंद ढोके यांनी बळकटीकरण प्रस्ताव सादरीकरणासाठी परिश्रम घेतले. माजी कृषिमंत्री व सध्याचे क्रीडामंत्री ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट दिली होती. यावेळी मंत्री ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या संशोधन केंद्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आवश्यक असणार्या सुविधा देण्यासाठी तत्वतः मान्यता दिली होती. याप्रसंगी मंत्री ना. अॅड. कोकाटे यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा तसेच प्रक्षेत्रावर सोयी सुविधा, येणार्या शेतकर्यांची राहण्याची व्यवस्था, प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव सादर होऊन मान्यता मिळाली व कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळात निधी मंजूर झाला. या केंद्राने राज्यातील शेतकर्यांसाठी व साखर उद्योगांकरिता अधिक ऊस व साखर उत्पन्न देणारे उसाचे 17 वाण प्रसारित केलेले असून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ऊस लागवड तंत्रज्ञानासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या 110 शिफारशी दिल्या आहेत. ऊस संशोधन केंद्र, पाडेगावने विकसीत केलेल्या ऊसाच्या फुले 265 आणि को 86032 वाणांनी ऊस क्षेत्रात क्रांती केली असून त्याचा लाभ असंख्य ऊस उत्पादकांना होत आहे. या वाणांखाली महाराष्ट्र राज्यात 75 टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे. या वाणांनी आत्तापर्यंत राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना रु. 1,00,787 कोटी दिले आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या आतापर्यंतच्या या गौरवशाली कार्यामुळेच सदरच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने मान्यता देवून भरीव निधी मंजूर केला आहे. राज्याच्या व देशाच्या अर्थकारणामध्ये मोलाचे योगदान असलेले पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राच्या विविध विकास कामांच्या प्रस्तावाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी माजी कृषि मंत्री, प्रधान सचिव यांनी मंजुरी देवून या केंद्राला सहकार्य केल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

1
151 views