
कासा येथे रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
डहाणू,कासा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली २४ ऑगस्ट रोजी कासा केंद्र येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले होते.
या स्टॉल्समध्ये डोंगर जिरा, आजोला, सातपुते, करडू, शिंद, घोसाळा, गळका, दुधी, कारले, कडीपत्ता, भोपळा, गवती चहा, शेवग्याचा पाला, टेटवी, माठ भाजी, भेंडी, काकडी, वांगी, मिरची अशा अनेक रानभाज्यांचा समावेश होता. ग्राहक मोठ्या उत्साहाने भाज्या खरेदी करताना दिसून आले. खरेदी करताना ते स्टॉलधारकांकडून त्या भाज्या कशा बनवायच्या आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे काय आहेत, याची माहिती घेत होते.
भाज्या विक्री करताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण या भाज्या त्यांनी जंगलात जाऊन अथक परिश्रम घेऊन आणल्या होत्या. या महोत्सवात समृद्धी स्वयंसहायता बचत गटाच्या प्रियांका तांबडा, नियती बचत गटाच्या सुनिता काटकर, दुर्गा बचत गटाच्या इंदू धांगडा, संजीवनी बचत गटाच्या सुनिता कदम, राधिका बचत गटाच्या सुंदर कुंभारे, सरस्वती बचत गटाच्या चंद्रकला गायकवाड यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला,त्या सर्व सहभागी बचत गटाच्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नियती बचत गटाच्या सुनिता काटकर म्हणाल्या, “अशा उपक्रमांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आम्ही आत्मनिर्भर बनू शकतो व आमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो. तसेच सरकारने आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी.”
कासा गावचे सामाजिक कार्यकर्ते अजय तुंबडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ज्या महिला दररोज रस्त्याच्या कडेला भाजी विकतात त्यांना योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. पावसाळ्यात रस्त्यावर विक्री करताना त्यांच्या भाज्यांवर चिखल, पाणी उडते, त्यावर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडला.