
नागाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा कळस; ओएनजीसी कडून मिळालेल्या निधीची उधळपट्टी?
वारेमाप टेंडर, बिले अदा मात्र सुविधांचा अभाव; प्रशासकीय अधिकारीच भ्रष्टाचाराचे कैवारी?
रायगड : राज भंडारी
उरण मधील ३२ ग्रामपंचायतींपैकी श्रीमंत समजली जाणारी नागाव ग्रामपंच्यात या ना त्या कारणाने चर्चेत असते. सन २०२१ मध्ये मराठी शाळेजवळ ग्रामपंच्यायतच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयाची टाकी मांडलेकर नावाच्या विकासकास खुल्या हाताने देण्यात आली. प्राथमिक शाळेजवळील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा एका बंगल्या करता दिली गेली. तसेच नागाव ग्रामपंचायतीला ओएनजीसी कडून सन २०२४/२०२५ मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र सदर निधी संपूर्ण संपेपर्यंत झोप न लागणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी ग्रामसेवकाला हाताशी धरून आलेल्या निधीची मनमानी करीत उधळण केली. तसेच अन्य प्रकारे टेंडर, त्याची बिले अदा करून ग्रामस्थांची फसवणूक केल्यामुळे उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.
नागाव ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी असलेली विकासकामे झालेली नाहीत. त्यातच अनेक कामांमध्ये अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न होता मूल्यांकन झालेले आहेत. म्हणजेच ज्या कामाच्या निविदा काढल्या जातात त्या नामधारी असून प्रत्यक्ष कामामध्ये अनेक प्रकार वगळले गेलेत. यामध्ये पंचायत समितीचे बांधकाम अभियंत्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने कोणत्याही कामाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. अंबिका वाडी येथील नाल्याचे लाखो रुपयांचे टेंडर असताना काम मात्र कमी किंमतीचे झालेले समोर आले आहे. तसेच झोपडपटी नागाव येथे बांधण्यात आलेला नाला लाखो रुपये खर्चून करण्यात आला आहे. याच नागावमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली, मात्र सदर पाईपलाईन टाकत असताना नित्कृष्ट दर्जाचे पाईप वापरून अंदाज पत्रिकेमध्ये जेवढी खोदाई पाहिजे होती, ती न होता पाईप वरच्यावर टाकून सर्व कंत्राट दस्तुरखुद्द सदस्यांनी केल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे नागाव ग्रामपंचायत म्हणजे याठिकाणी सत्ता भोगणाऱ्यांसाठी सोन्याची अंडी देणारी ग्रामपंचायत म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांच्यावातीने केला जात आहे.
त्याचबरोबर नागरिकांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना मोठे नागाव येथे एका रस्त्यावर साकव टाकण्याकरिता लाखोंचे कॉन्ट्रॅक्ट काढले गेले, तर पथदिव्यांच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपहार झाल्याची देखील बोंब झाली आहे. अशाच प्रकारचे एक काम नागाव ओएनजीसी प्लांट जवळील प्रकल्पातून येणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकण्याकरिता ओएनजीसीने नागाव ग्रामपंचायतीला १ करोड रुपयांचा निधी दिला होता. सदर कामाचे ऑनलाईन टेंडर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने १० पार्टमध्ये ९ लाख ९८ हजारांची वेगवेगळी कंत्राटे काढली. मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी दोन कोटेशन जास्त दराचे दाखवून कंत्राट A N enterprises ला देण्यात आले. यावेळी काम सुरु असताना स्थानिकांनी सदरचे काम नित्कृष्ट होते असल्याच्या तक्रारी देखील केल्या. मात्र ग्रामपंचायतीने पूर्णपणे डोळेझाक केली. सदर काम ठेकेदाराने पूर्ण तर केलेच पण बिल काढण्यासाठी A N enterprises या ठेकेदाराने नागाव ग्रामपंचायत हद्दीतील इतर कामे केल्याचा दाखला देत, बिल नाही दिले तर पोलीस तक्रार करेन अशी धमकी देखील दिली असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे कोणतेही काम करताना त्याचा ठराव, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, आर्थिक तरतूद या गोष्टी पूर्ण झाल्यावर निविदा प्रक्रिया राबविली जाते, त्यानंतर वर्कऑर्डर दिल्या जातात आणि नंतर काम चालू केले जाते. मात्र A N Mhatre या ठेकेदाराने ग्रामपंचायत नागाव यांना काम पूर्ण केले असे सांगत ठराव घेऊन पैसे द्यायची मागणी केली. सर्व नियमांना धाब्यावर बसवून चाललेला कारभार संशयाच्या गर्तेत सापडण्यास वेळ लागला नाही. काम न करता बिले काढण्याची पद्धत हे नागाव ग्रामपंचायतीचे पाऊल भयानक परिस्थितीकडे घेऊन जात आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे दोघेही कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ शकतात. तसेच नागाव ग्रामपंचायत मधील कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी व सरपंच नागाव यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.