logo

जेवळी येथील आमरण उपोषण ला काही कालावधी करिता स्थगिती

आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शामसुंदर तोरकडे यांचे उपोषण २१ व्या दिवशी स्थगित

धाराशिव, २२ ऑगस्ट २०२५:
मौजे जेवळी येथील लिंगायत स्मशानभूमीच्या विविध मागण्यांसाठी लोहारा तालुका काँग्रेस अध्यक्ष शामसुंदर (राजू) तोरकडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर आज २१ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. आमदार प्रवीण स्वामी गुरुजी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नारळपाणी घेऊन उपोषण सोडले. त्यांच्यावर सध्या धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.

गेल्या २१ दिवसांपासून श्री. तोरकडे यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने सर्व स्तरांतून चिंता व्यक्त केली जात होती. गुरुवारी, काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रवीण स्वामी आणि जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, प्रशासकीय पातळीवर त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर, उपस्थित ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन श्री. तोरकडे यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

'शिवकृपा परिवारा'तर्फे सर्वांचे आभार

उपोषण स्थगित झाल्यानंतर, श्री. तोरकडे यांच्या 'शिवकृपा परिवारा'तर्फे एक निवेदन जारी करून या कठीण काळात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, त्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. "उपोषण सुटावे आणि त्यांचे आरोग्य ठीक राहावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या, त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या राहिलेल्या, प्रशासकीय कामात मदत केलेल्या सर्व जनतेचे, नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत," असे निवेदनात म्हटले आहे.
उपोषण जरी स्थगित झाले असले, तरी स्मशानभूमीच्या जागेच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे संकेत समर्थकांकडून मिळत आहेत.

92
3128 views