
पालघर पोलीस दलाच्या सेवेत आधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन
गुन्हे तपासात येणार वेग व अचूकता
पालघर : गुन्ह्यांचा तपास वेगवान व तंत्रशुद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधा असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन नुकतीच प्राप्त झाली आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना, मुंबई यांच्या मार्फत पालघर पोलीस दलाला ही व्हॅन उपलब्ध झाली असून, दि. १९ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या हस्ते या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वैज्ञानिक तपासासाठी आवश्यक असलेली भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याची सर्व अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे. घटनास्थळीच प्राथमिक तपास करून पुरावे जतन करण्यास या वाहनाचा मोठा उपयोग होणार असून, गुन्हे उकलण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि परिणामकारक होणार आहे.
या व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास करताना पुरावे तंत्रशुद्ध पद्धतीने गोळा करता येतील. परिणामी न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे अधिक ठोस होतील व गुन्हेगारांना शिक्षा होण्याची शक्यता वाढेल. जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला मोठी गती मिळून नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत ठेवण्यासाठी चार फॉरेन्सिक एक्सपर्ट, दोन सायंटिफिक एक्सपर्ट, दोन फॉरेन्सिक सहाय्यक व दोन चालक असे प्रशिक्षित मनुष्यबळ पालघर जिल्ह्यास उपलब्ध झालेले आहे.
या व्हॅनच्या मदतीने गुन्हे तपासामध्ये लागणारा वेळ कमी होऊन, अचूक तपास व न्यायनिवाडा होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस दलाची क्षमता वाढून गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.