logo

जलसंधारणाचे मूल्य अमूल्य

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकाराव नाईक यांनी जलसंधारणा चे महत्व ओळखून जलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक , पाणी आडवा पाणी जिरवा हा ध्यास घेणारे व   स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती करून जलसमृद्ध महाराष्ट्र करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे करिता त्यांनी  अथक परिश्रम केले. दूरदृष्टी आणि योग्य वेळी योग्य निर्णयक्षमता हे त्यांचे विशेष गुण होते. ग्रामीण भागातील इत्यंभूत माहिती त्यांना होती. त्यांचा स्मृती दिन म्हणून १० मे हा जलसंधारण दिन  म्हणून  साजरा   करण्यात येतो.    
सकाळ झाली कि पहिली सुरवात होते ती उष:पानाने ते  झोपताना उशाशी पाण्याचा तांब्या भरून ठेवण्या पर्यंत. दिवसभरात वेगवेगळ्या कारणास्तव पाण्याची गरज प्रत्येकास लागत असते. आणि. पाणी हा समस्त प्राणिमात्राचा अविभाज्य घटक आहे. एक दिवस पाणी नाही मिळाले तर काय अवस्था होते हे आपण अनुभवतो. ज्याला कष्ट पडतात त्याला त्याची किमत कळलेली असते, आणि म्हणूनच  तो त्याचा वापर फारच जपून व काटकसरीने करतो. या उलट  पाणी ज्याला खूप मुबलक असते  त्याला त्याची पर्वा नसते व तो त्याचा वापर अत्यंत बेफिकीरीने व गैरशिस्तीने करतो.  
पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील स्त्रोत फारच थोडे असल्याने त्याचा वापर फारच काटकसरीने करणे व उपलब्ध असलेल्या स्त्रोताची निगा राखून संवर्धन करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा विचार केला तर भविष्यात पाण्याचे योग्य व अत्यंत काटकसरीने वापर करावा लागेल. काही दुष्काळी भागात विशेष उपाय योजना राबवाव्या लागतील. बऱ्याच  ठिकाणी माउलीना  पिण्याचे पाणी कित्येक किलोमीटर पायपीट करून  डोक्यावर आणावे लागते. आपणास आठवत असेल तर दुष्काळात लातूर शहर करिता रेल्वे ने पाणीपुरवठा केला होता. खेडेगावात प्रत्येक शेतात शेततळे घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि तसा प्रचार झाला पाहिजे. जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत कमी होत असून शक्य तितक्या ठिकाणी पाणी अडवून जिरवले गेले पाहिजे. वृक्ष लागवड करून जमिनीची धूप थांबवली पाहिजे. शेतीत ठिबक सिंचन चा वापर केला गेला पाहिजे. गावागावात श्रमदानाने छोटी मोठी धरणे बांधून  जलसंचय केला पाहिजे. छोट्या मोठ्या धरणातील गाळ काढून जलसंचय वाढवला पाहिजे. प्रत्येक वेळेस शासन मदती वर  अवलंबून न राहता  प्रत्येक गावाने लोकसहभागातून जलसंधारण योजना राबवल्या पाहिजे. अशी बरीच गाव आजही आदर्श म्हणून पाहता येईल व तसे उपक्रम हाती घेता येतील. फक्त प्रत्येकाची. इच्छाशक्ती  आणि काम करण्याची तळमळ हवी. हवामान बदलामुळे पाऊस आता वेळी अवेळी पडतो आणि जेव्हा आवश्यक आहे तेव्हा तो दडी मारतो. त्यामुळे जलसंचय अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्या प्रमाणे पिकाचे नियोजन करणे क्रमप्राप्त झाले आहे. नैसर्गिक पाण्याचे उपलब्धतेचे जे ठिकाण आहेत ते स्वच्छ राखले पाहिजे. सहलीला जाताना धरणे, नद्या, तलाव, सरोवरे, इत्यादी ठिकाणी प्लास्टिक किवा कागदी कप, कागद, कचरा फेकून  प्रदूषण  होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पहिजे. निसर्ग निर्मित गोड्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ आणि प्रदूषणरहित राहतील अशी खबरदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी. आज आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच छोट्या मोठ्या बैठ्कामध्ये, समारंभात, विवाह सोहळ्यात  पाण्याच्या बाटल्या थोड पाणी पिऊन टाकलेल्या आढळतात.  हे कुठेतरी थांबवून भावी पिढीवर  चांगले संस्कार व्हायला हवे. शिस्त लागायला हवी. पूर्वीच्या लोकांनी भविष्य काळातील धोका ओळखून मोठ मोठ्या बारव बांधल्या, परंतु त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे तिला कचरा कुंडी करून गावात  रोगराई   वाढण्यास    अप्रत्यक्षपाने मदत केल्यासारखे आहे. त्या बारव/हौद  स्वच्छ करून पाणी साठवले पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे किंबहुना घरातील काम समजून खालील  किमान उपाय योजना काळजीपूर्वक आचरणात आणल्या पाहिजेत
१.मुळात जगात गोड्या पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्या दृष्टीने भविष्यातील संभाव्य धोका ओळखून असे स्त्रोत प्रदूषणमुक्त ठेऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला  पाहिजे. 
२.पाण्याचा आवश्यक आणि गरजेपुरताच वापर केला पाहिजे.
३.पिण्याचे पाणी प्रत्येकाला गरजेप्रमाणे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
४.दुचाकी, चारचाकी, वाहन धुणे करिता पुन:वापराचे कमीत कमी पाणी वापरले पाहिजे. 
५.पाणी वाचवणे जलस्त्रोत स्वच्छ ठेवणे, गरजेपुरता पाण्याचा वापर करणे या बाबत सतत जन जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.
६.वृक्षरोपण व त्याच बरोबर संगोपन करून  क्षेत्र वाढवणे बाबत प्रोत्साहन दिले पाहिजे.
७.पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे.
८.कारखाने, कंपनी यामधील उत्सर्जित द्रव नदीच्या शुद्ध पाण्यात मिसळले जाऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे.
९.घराच्या छतावर पावसाचे पडणारे पाणी अडवून साठवणूक करून अडचणीच्या वेळी वापरले पाहिजे.
१०. पाण्याचे संरक्षण आणि अनावश्यक वाया जाणारे पाणी या बाबत कडक कायदे आवश्यक आहेत.
११.पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जसे तलाव, सरोवर, धरणे, बंधारे विहिरी, बारव   ज्यामुळे भूजल स्तर वाढण्यास मदत होईल अश्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.  
१२.सार्वजनीक  ठिकाणी जसे शाळा, महाविद्लाय, हॉस्पिटल, मंदिर, सरकारी वसाहती, बस स्थानके इत्यादी ठिकाणी विनाकारण पाणी वाहून जाते ते गळणारे नळ दुरुस्त करून पाणी व्यर्थ जाणार नाही याची काळजी घेणे.
१३.अंघोळ, दाढी करताना हात धुताना आवश्यकता नसल्यास नळ बंद करणे.
१४.कोरड्या विहिरि चे पुन:भरण  करणे गरजेचे आहे. 
१५.इमारतीवर रेन वाटर हार्वेस्टिंग करण्यात यावे.     
सध्या भूजल उपसा करण्यावर कोणतेही नियंत्रण नाही ते असणे गरजेचे आहे. मनुष्य प्रण्याकरिता  सरासरी ३ ते ४ लिटर आणि इतर प्रनिमात्राना ४०-५० लिटर पाण्याची गरज असते. 
झपाट्याने  वाढते शहरीकरण, औद्योगिक करण, आणि त्याच बरोबर वाढती लोकसंख्या यामुळे प्रत्येक  ठिकाणी पाण्याची आवश्यकता  वाढते आहे. त्याच बरोबर काही नदीस्त्रोत वाहणारे सांडपाणी यामुळे पाणी दुषित होत आहेत. पाण्याशिवाय जीवन असंभव असल्याने त्याची बचत करणे फारच गरजचे आहे. 
 पाण्याचे मुल्य दुष्काळी भागात रहात असलेल्या लोकांना ठाऊक आहे. आज बऱ्याच एन जी ओ काही जलतज्ञ, शासनाचे कृषी विभाग, जलसंधारण  विभाग, कृषी विद्यापीठ या वर काम करित आहेत. भुजलतील  पाणी साठवणे करिता योग्य नियोजन होणे आवश्यक  आहे.
शहरी भागातील तरूणाई ने वीकेंड करिता अन्यत्र जाऊन जेवणाचे प्लास्टिक ताट, कप, ग्लास , बाटल्या व अन्य कचरा करुन प्रदूषण वाढवण्यापेक्षा पावसाळा येण्याच्या पूर्वी  2 दिवसाचे आपल्या कुटुंबासह एखाद्या दुष्काळग्रस्त खेड्याकडे जावून श्रमदानाने शेतातील छोटे मोठे तलाव, जुन्या विहिरींचे पुन:र्भरण, छोटे बंधारे इत्यादी उपक्रम  राबववेत. एक वेगळा अनुभव येईल  आपण लोकोपयोगी विशेषतः अन्नदात्या करिता काम केल्याचे समाधान लाभेल व मुलावर चांगले संस्कार घडतील, आणि यातूनच पाण्याचे मूल्य किती अमूल्य   याची जाणीव होऊन प्रत्येकाला काहितरी समाजभिमुख काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे   सार्थक होईल. हा विचार एक दिवसा पुरता मर्यादीत न राहता कायम स्वरूपी चळवळ झाली पाहिजे.

69
14752 views