logo

जनता विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा


पुणे, दि. १४ ऑगस्ट २०२५: जनता विद्यालयात गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी अखंड भारत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे सर्व उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी पूजन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहावी (ब) ची विद्यार्थिनी कु. पायल विष्णू गायकवाड होती, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे आणि आयोजक प्रशांत देशमाने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अखंड भारत दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे दिली आणि देशभक्तीपर समूहगीते सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. यासोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक भित्तीपत्रकेही सादर करण्यात आली. सुदाम चंद्रे यांनी अखंड भारताच्या संकल्पनेवर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्ष कु. पायल गायकवाड हिने आपल्या भाषणातून प्राचीन अखंड भारताच्या समृद्ध आणि सुसंस्कृत वैभवाची माहिती दिली. प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी (ब) च्या विद्यार्थिनी अंजली गुंजकर आणि दिव्या ठोंबरे यांनी केले, तर शिवकन्या बोरकर हिने आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या यशस्वी कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

9
990 views