logo

रत्नागिरीचे नेते प्रशांत यादव भाजपत; १९ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश; पत्रकार परिषदेत मत्स्य विभाग मंत्री ना.नितेश राणे ची घोषणा

महाराष्ट्र राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री व जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी केली. पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
नितेश राणे म्हणाले, "प्रशांत यादव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला असून सहकार क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. असा नेता भाजपात आल्याने पक्षाला निश्चितच बळ मिळेल."
प्रशांत यादवांचा प्रवेश सोहळा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
राणे यांनी सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत हे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रशांत यादव यांनी आपल्या कार्यक्षमता व जनाधार पाहून योग्य निर्णय घेतला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते चिपळूण विधानसभा मतदारसंघात केवळ ६,८०० मतांनी पराभूत झाले होते, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात २०२९ मध्ये भाजप विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ स्वप्ना यादव यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत यादवांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजप
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रवेश सोहळ्यास मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

15
782 views