
सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवडच्या वतीने भव्य तिरंगा रॅली
सातारा:
(म्हसवड ता. माण) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025 च्या दुसऱ्या टप्प्यात सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या घोषणांनी आणि रंगीबेरंगी वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा संदेश संपूर्ण शहरभर पोहोचवला.
या रॅलीमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. यू. दासरे, उपमुख्याध्यापक श्री. पी. के. यादव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक आणि विविध पारंपरिक पोशाख परिधान करून आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाला जिवंत केले. तसेच, पोस्टरद्वारे व घोषणांद्वारे स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
रॅलीचा मार्ग सिद्धनाथ हायस्कूलपासून सुरू होऊन उमाजी नाईक चौक, मानगंगा नदी बायपास, नगरपालिका रोड, महात्मा फुले चौक, बस स्टँड असा ठरवण्यात आला होता. शेवटी पुन्हा सिद्धनाथ हायस्कूल येथे पोहोचत या भव्य रॅलीची सांगता झाली.
रॅलीदरम्यान शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. शाळेच्या वतीने या रॅलीला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली तसेच “हर घर तिरंगा”चा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले.