logo

अवैध वाळू उपसा करणा-या तिघांविरुद्ध गुन्हा; ४२ लाखांचा ऐवज जप्त


नांदेड ः शहरालगत असलेल्या विष्णुपूरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून वाळूमाफिया तराफ्यांच्या सहाय्याने उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी छापा घालून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ४२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.


दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार पुन्हा स्वीकारणा-या ओमकांत चिंचोलकर यांनी कोणत्याही परिस्थितीत अवैध व्यवसाय चालणार नाही तसेच अवैध वाळू उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्यासंदर्भात ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना समज दिली होती. मंगळवारी रात्री गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा घातल तीन तराफे, १५ ब्रास रेती, एक हायवा असा तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हिराचंद संभाजी भोकरे यांच्यासह दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. मुदखेड, नायगाव, ग्रामीण तसेच लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळू उपसा करणा-याविरुद्ध गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या. कोट्यवधी रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. पण राजकीय पाठबळ असल्याने अवैध वाळू उपसा सुरुच आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या फ्लशआऊट उपक्रमांतर्गत अवैध वाळू उपसा व अवैध वाळू वाहतूक या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणा दिवसरात्र एक करून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करत असले तरीही अवैध वाळूची वाहतूक अद्याप पुर्णतः थांबली नाही. मंगळवारी रात्री ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कौतूक केले आहे.

0
0 views