logo

काही गणेश मंडळांचे डीजेमुक्त मिरवणुकीचे आश्वासन

जिल्ह्यातल्या ५३१ गावात एक गाव एक गणपती




नांदेड ः नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातील ५३१ गावात एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी प्रयत्नरत आहेत. काही गावांनी डीजेमुक्त मिरवणुका काढण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.


नांदेड जिल्ह्यात चार हजारपेक्षा अधिक गावे आहेत. प्रत्येक गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नरत्न आहे. शांततापूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नरत आहेत. ५३१ गावांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. आता या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी गावा-गावात जाऊन नागरिकांची संवाद साधत या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन करीत आहेत.


कंधारमध्ये आर्यवैश्य गणेश मंडळ व नगरेश्वर गणेश मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा या दोन्ही मंडळांनी डीजेमुक्त विसर्जन मिरवणुका काढण्यासंदर्भात पोलिसांना आश्वस्थ केले आहे. या दोन्ही गणेश मंडळांकडून डीजे वाजविला जाणार नाही, असे सांगण्यात आले. डीजेमुळे होणारे प्रदूषण व नागरिकांना होणारा त्रास याबाबत सर्वच पोलीस ठाण्याकडून आता प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकामध्ये डीजेची संख्या कमी असणार आहे.


नांदेड पोलीस दराने तीन बक्षिसांची घोषणा केली आहे. जी गणेश मंडळ व्यसनमुक्त, डीजेमुक्त व अवैध व्यवसायमुक्त तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील अशांना बक्षीस मिळणार आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एक गाव एक गणपती या उपक्रमासह अन्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन सज्ज असल्याचे सांगत या बैठकीत सर्वधर्मियांनी आपापले उत्सव आनंदाने उत्साहाने साजरे करताना अन्य धर्मियांच्या लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव, ईद या सणासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अतिसंवेदनशील भागावर पोलिसांची विशेष नजर आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


नांदेड पोलीस यंत्रणा सण व उत्सवासाठी सज्ज आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. त्यांचा यथोचित गौरव होणार आहे. आतापर्यंत ५३१ गावक-यांनी एक गाव एक गणपती बाबत निर्णय घेतला आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. सर्व समाजांनी एकमेकांचा आदर करत हे सण उत्साहाने साजरा करावेत.
अबिनाशकुमार
पोलीस अधीक्षक, नांदेड


0
0 views