logo

देवळी नगरपरिषद हद्दीतील मिरननाथ मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य


देवळी, दि. १२ ऑगस्ट —
देवळी नगर परिषद क्षेत्रातील ऐतिहासिक मीरंनाथ मंदिर परिसर आजघडीला घाणीच्या विळख्यात सापडला असून, येथील अस्वच्छतेने नागरिक आणि भाविकांचे हाल होत आहेत. रस्त्यांवर जनावरांची विष्ठा, कचऱ्याचे ढीग आणि झुडपांनी व्यापलेले मोकळे भूभाग — अशी परिस्थिती काही दिवसांपासून कायम असून प्रशासन मात्र ठोस कारवाईपासून दूर आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मंदिर परिसराभोवती साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, मच्छर, माशांचा त्रास वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. धार्मिक स्थळाजवळ अशी परिस्थिती असणे हे भाविकांच्या श्रद्धेला धक्का देणारे आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही नागरिकांनी नगर परिषदेच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत सांगितले की, "स्वच्छ भारत मिशनच्या गाजावाज्यात घोषणा करण्यात आल्या, पण प्रत्यक्षात शहरातील धार्मिक स्थळेही घाणीपासून वाचू शकलेली नाहीत."

नागरिकांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा हटविण्याची, रस्त्यांची साफसफाई करण्याची आणि परिसर सुशोभित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

28
6082 views