logo

नोकरी निवडताना संरक्षण सेवेला प्राधान्य द्या ..... विलासराव इंदलकर



सातारा ( म्हसवड..... प्रतिनिधी )
संरक्षण सेवा हीच खरी देश सेवा असून जीवनातील नोकरीची संधी शोधताना संरक्षण सेवेला पहिले प्राधान्य देण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या जीएसटी विभागाचे अप्पर आयुक्त विलासराव इंदलकर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे
युवा पिढी व स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
यावेळी वरिष्ठ विद्युत अधिकारी लहू कांबळे व प्राचार्य विठ्ठल लवटे उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या शैक्षणिक वर्षातील पहिला कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जीएसटी विभागाचे माजी अप्पर आयुक्त विलास इंदलकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.
यावेळी बोलताना अप्पर आयुक्त विलासराव इंदलकर म्हणाले आज सर्वच क्षेत्रात नोकरीसाठी जीव घेणे स्पर्धा सुरू आहे. त्याला अनेक विषय कारणीभूत आहेत. विद्यार्थी जीवनाला सुयोग्य पैलू पाडण्यासाठी योग्य शिक्षण क्षेत्र शाखेची निवड करणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेच्या 1 लाख 20 हजार जागेसाठी वीस लाख तर जेईई च्या अंदाजे 16 हजार जागेसाठी 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. या परीक्षेच्या यशासाठी तात्पुरत्या तयारी ऐवजी माध्यमिक स्तरावरील फाउंडेशन कोर्स करणे सुद्धा महत्त्वाचे असल्याचे इंदलकर यांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोग, व राज्य लोकसेवा आयोग यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा, उपलब्ध जागा परीक्षेसाठी शैक्षणिक तयारी व करावयाचा अभ्यास याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर, इंजिनीयर वकील यांचे शिवाय इतर विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी, रेल्वे सेवा, बँकिंग, आयआयटी , ए आय.,आयशर, अभियांत्रिकी , एन डी ए तसेच सी डी एस इत्यादी क्षेत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम, घ्यावयाची काळजी, व करावयाचे नियोजन याबाबत विलासराव इंदलकर यांनी तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पुढे बोलताना विलासराव इंदलकर म्हणाले जीवनात उच्च ध्येय ठेवा. कष्टाला पर्याय नाही.नेहमी सकारात्मक रहा ,.योग्य नियोजन करा. शालेय अभ्यासाबरोबरच खेळ आणि अवांतर वाचन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रगती उपक्रमशीलता, तसेच सुयोग्य व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले.
विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून या शिक्षण संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचे इंदलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अदानी कंपनीतील वरिष्ठ विद्युत अभियंता अधिकारी लहू कांबळे यांनी कौशल्य युक्त शिक्षण तसेच देश व परदेशातील शैक्षणिक संधी याबाबत मार्गदर्शन केले. यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी शिंदे यांनी केले.

0
0 views