जुगारावर धाड, नऊ जण ताब्यात...
जळगाव : हरिविठ्ठल नगर परिसरात सुरूअसलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तीन लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरिविठ्ठल नगर परिसरात पत्त्यांचा अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोउनि शरद बागल, अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.या पथकाने जुगारावर छापा टाकला. या ठिकाणाहून नऊ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेत रोख रकमेसह दुचाकी व मोबाइल असा एकूण तीन लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे