संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुकमध्ये महावितरणचा अनधिकृत मीटर बदल; नागरिक संतप्त
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे महावितरणने घरमालकांच्या परवानगीशिवाय व कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही घरे बंद असतानाही, कुलूपबंद गेट असलेली घरे असूनही, महावितरणने जबरदस्तीने जुने मीटर काढून नवीन मीटर लावल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार सरळसरळ अतिक्रमण व अनधिकृत कारवाई आहे. अशा एकतर्फी कृतीने ग्रामस्थांच्या मनात महावितरणविषयी गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घर बंद असल्यास रीडिंगच्या वेळी "घर बंद" असा शेरा लिहिला जातो, पण तक्रार केल्यावर मात्र महावितरण दुर्लक्ष करते. मात्र मीटर बदलताना कोणतीही चौकशी न करता थेट कारवाई केली जाते, हे नागरिकांच्या दृष्टीने विचार करायला लावणारे आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलीस निरीक्षकांकडे शासकीय कागदपत्रांसह निवेदन देत या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.