
Pune : पुण्यात मध्यरात्री थरार ! फरासखाण्यातील पोलीस हवालदाराचा तडीपार गुंडाकडून सपासप वार करून खून
पुणे। कडक लॉकडाऊन आणि बंदोबस्तात डबल मर्डरने पुणे हादरून गेले असून, वर्षांपासून तडीपार असलेल्या गुंडाने बुधवार पेठेत एका पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या खुनाने पोलिसांची झोप उडाली असताना त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञाताने खून केला आहे. या दोन्ही घटना काही तासांत घडल्या आहेत. यामुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस हवालदार समीर सय्यद (वय ४८) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजन याने हा खून केला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या राणी (वय २४) नावाच्या महिलेचा खून झाला आहे. अद्याप तिचे पूर्ण नाव आणि तिचा खून करणाऱ्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण महाजन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बॉडी ऑफेन्सचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे त्याला गेल्या वर्षी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते
मात्र, तडीपार काळात देखील तो शहर आला. इतकेच नाही तर मध्यवस्तीत तो आला होता. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ आल्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्याराने पोलीस हवालदार समीर सय्यद यांचा खून केला आहे. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस दलात खळबळ उडाली माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. तर प्रवीण याला ताब्यात घेतले. त्याने हा खून का केले हे अद्याप समजू शकलेले नाही. एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तपास करत होते.
पोलीस हवालदार समीर सय्यद ड्युटी संपवून घरी जात होते. खडक पोलीस लाईनमध्येच ते राहण्यास होते. ते बुधवारी इलेक्शनचा बंदोबस्त असल्याने पोलीस ठाण्यात आले होते. बंदोबस्त काढून त्याचे वाटप झाल्यानंतर घरी जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांचे पाहिले काही वाद होते का किंवा इतर काही याचा देखील तपास केला जात आहे.
याच गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखा तपास करत असतानाच तीन वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतच एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तपास सुरू केला. पण तिचा खून का आणि कोणी केला हे समजू शकलेले नाही. आता या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपी पसार झाला आहे. राणी नाव असलेल्या या तरुणीचा नेमका खून का झाले हे समजू शकलेले नाही. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.