
सातारा शहरात औषध फवारणी व फॉगिंग करण्यात यावे – संभाजी ब्रिगेडची प्रशासनाला मागणी
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरात पावसामुळे झाडाझुडपांची दाटी निर्माण झाल्याने डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डेंगू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन औषध फवारणी व फॉगिंग मशीनच्या सहाय्याने धूर फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने मागणी केली की, प्रत्येक घराभोवती, शाळा, अंगणवाड्या, वस्ती परिसर अशा सर्व ठिकाणी नियमित औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात यावी. तसेच, आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून संभाव्य रोगप्रसाराचे नियंत्रण करावे. डेंगू व मलेरिया चे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष रफीक शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेने प्रशासनास आवाहन केले की, शहरभर जनजागृतीसाठी जागोजागी सूचना फलक लावावेत व या रोगाविरोधात जनतेला सजग करण्यात यावे.