
सुप्रिया सुळे यांची संजय गायकवाड यांच्याविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
पुणे-मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.याबाबत त्यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
राज्यात सध्या खोट्या शासकीय निर्णय (जीआर) प्रसारित करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ होत आहे. तसेच पुणे शहरात विविध गुन्ह्यांत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही तीन चार महत्वाच्या विषयांवर तक्रार करायला आलो आहोत. पुणे शहरात कोयता गँग तसेच विविध गुन्ह्यांत वाढ झाली आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका आमदाराने आमदार निवासात हॉटेल कर्मचारी यास मारहाण केली आहे. आमदार निवासात काही आमदार राहण्यासाठी येत असतात. मी समजू शकते की जेवण खराब असेल, पण याची तक्रार कम्प्लेंट बुकमध्ये करण्याची गरज होती. प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट बुक असतात. पण आमदार निवासात अशी मारहाण करत असाल, तर आपण काय आदर्श महाराष्ट्राला देणार आहोत? या प्रकरणी सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज होती. पण सरकार गुन्हा दाखल करताना दिसत नाही. विरोधी पक्षाने काही केले नाही तरी, आमच्या घरापर्यंत ईडी पोहोचते ही बाब खूप दुर्दैवी आहे.
महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यात अनेक खोटे जीआर काढले जात आहेत. करोडो रुपयांची कामे केली जात आहेत. असे खोटे जीआर कोण काढतंय? याची पारदर्शक चौकशी झाली पहिजे. हे खूप मोठे रॅकेट असल्याने याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामविकास विभागाचा खोटा जीआर आला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि पारदर्शक चौकशी करावी. याची माहिती आम्ही आत्ता पोलिसांना दिली. त्यांनी आम्हाला सांगितले आहे की, आम्ही माहिती काढतो. याबाबत गुन्हा दाखल करण्याची पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी आहे. आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत.