logo

"पोलिसांची वर्दी घातली... पण मनात शिक्षक बसला!"


अशोक राठोड या एका पोलीस कॉन्स्टेबलची विद्यार्थ्यांसाठी झिजणारी प्रेरणादायी कहाणी.....

यवतमाळ:- जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आंमडी या छोट्याशा गावात जन्मलेले आणि सध्या यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अशोक रामधन राठोड हे केवळ एक कर्तव्यदक्ष पोलीस नसून,ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक,प्रशिक्षक आणि जीवनातला दीपस्तंभ ठरले आहेत.
घाटंजी येथील गिलानी कॉलेजमधून बारावी,तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.घरात आई ललिता राठोड शेती करतात आणि वडिलांचा वडिलोपार्जित छोटेखानी फर्निचर व्यवसाय.या सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या अशोक राठोड यांनी फक्त २३ व्या वर्षी पोलीस खात्यात प्रवेश मिळवला.शिक्षण घेता घेता नोकरीत प्रवेश करत त्यांनी स्वतःची वाट शोधली,पण त्याच वेळी इतरांसाठी रस्ता खुला करण्याची जबाबदारीही घेतली.

संघर्ष ग्रुपची स्थापना –
हजारो विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास
२०१३ मध्ये पोलीस भरतीत निवड झाल्यानंतर लगेचच २०१५ मध्ये"संघर्ष ग्रुप" या नावाने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण सुरु केलं.यामध्ये शारीरिक चाचणीपासून लेखी परीक्षेपर्यंत सर्व तयारी अगदी निशुल्क केली जाते.आजवर या ग्रुपच्या माध्यमातून २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण मिळालं असून,२०० पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस खात्यात यशस्वीपणे रुजू झाले आहेत.
त्यामध्ये विशेषत्वाने ८५ मुली आदिवासी भागांमधून,तांड्यांमधून, ग्रामीण कुटुंबांमधून पुढे येऊन पोलीस बनल्या आहेत,हे राठोड सरांच्या कार्याचे मोठे यश आहे.

डाएट,सायकल वाटप,आणि समाजाभिमुख उपक्रम---
फक्त प्रशिक्षण पुरेसं नाही,याची जाणीव असलेल्या राठोड सरांनी विद्यार्थ्यांच्या पोषणावर,प्रवासाच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करून दरवर्षी सायकल वाटप सुरू केल्या.स्वतःच्या पगारातून सायकली देणं,पोषणसहाय्यता देणं,रक्तदान,आरोग्य शिबिरं, वृक्षारोपण,मिनी बुक बँक यांसारख्या सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं,ही त्यांची नित्याची कार्यपद्धती आहे.

नेहरू स्टेडियमवर संघर्षाची ओळख---
आज नेहरू स्टेडियमवर ‘संघर्ष ग्रुप’ म्हणलं की,अशोक राठोड सर आठवतात.शारीरिक चाचणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण,नव्या पॅटर्नमध्ये ५० पैकी ५० गुण मिळवले आहेत,ही त्यांच्या प्रशिक्षणाची साक्ष आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व सामाजिक कार्याची दखल----
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अशोक राठोड सर यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल जिल्हाधिकारी मा.विकास मीना यांच्या हस्ते,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सन्मानित करण्यात आले.
१०० मीटर आणि लॉन्ग जंप या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेते असलेले अशोक राठोड सर पोलीस विभागाच्या स्पर्धांमध्ये यवतमाळचे यशस्वी प्रतिनिधी ठरले आहेत.

सहकार्य आणि आधारस्तंभ---
या कार्यात जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांचे सातत्याने सहकार्य लाभत आहे.तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते साहेब यांचे मार्गदर्शन व प्रेरणा अशोक राठोड सरांना प्रेरणास्थान ठरले आहे.

नोकरीवर रुजू झाले,पण "कर्तव्य" समजलं समाज घडवणं!
अशोक राठोड हे नाव आज केवळ पोलीस खात्यातील कर्मचारी म्हणून नव्हे,तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या एक शिक्षक,एक सखा,एक योध्दा म्हणून घेतलं जातं.

पोलीस वर्दीतून समाजसेवेचा झेंडा उंचावणाऱ्या अशोक राठोड यांना मनःपूर्वक सलाम!

33
1132 views