जयसेवा आदर्श हायस्कूल पवनी येथे वृक्षारोपण व सीडबॉल रोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला
पवनी (प्रतिनिधी) – दिनांक 2 जुलै 2025 रोजी बनियान ट्री फौंडेशन व जयसेवा आदर्श हायस्कूल, पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण व सीडबॉल रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मृदुला मॅडम (टाटा ट्रस्ट, पुणे) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत झाली. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यासोबतच, जैवविविधता वाढविण्यासाठी व पावसाळ्याच्या अनुकूलतेचा वापर करून शाळेच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागांमध्ये सीडबॉल रोपण करण्यात आले.मृदुला मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाळ जोडण्याचे महत्त्व पटवून दिले. "एक झाड, एक जीवन" ही संकल्पना फक्त उपक्रमापुरती मर्यादित न ठेवता, ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव वाढीस लागेल, असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.